प्रदीप कल्याण कुटे (वय २४) हा ट्रॅक्टरचालक असून रविवारी तो माढा तालुक्यातील केवडच्या बबनराव शिंदे साखर कारखान्यासाठी धानोरे येथून ऊस घेऊन निघाला होता.
गाणं जोरात लावल्याच्या कारणावरुन माढा तालुक्यात पोलिसांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी घडली. या मारहाणीनंतर रुग्णालयात दाखल केलेल्या तरुणाचा मृत्यू झाला असून पोलिसांच्या मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको करुन संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी केली.
उस्मानाबाद जिल्ह्यात राहणारा प्रदीप कल्याण कुटे (वय २४) हा ट्रॅक्टरचालक असून रविवारी तो माढा तालुक्यातील केवडच्या बबनराव शिंदे साखर कारखान्यासाठी धानोरे येथून ऊस घेऊन निघाला होता. त्याच्यासोबत ट्रॅक्टर ट्रॉलीत त्याची आई देखील होती. मानेगाव येथे पोहोचले असता टेपरेकॉर्डरवर गाणं जोरात लावल्याच्या कारणावरुन पोलिसांनी त्याला अडवले. यानंतर पोलिसांनी प्रदीपला चौकीत नेऊन त्याला मारहाण केली. हा प्रकार सुरु असताना त्याची आई ट्रॅक्टर ट्रॉलीत बसली होती.
मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या प्रदीपला तातडीने माढ्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र, पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाला, असा आरोप प्रदीपच्या नातेवाईकांनी केला आहे. संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रास्ता रोको करुन संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत रास्ता रोको देखील केला. रात्री उशिरापर्यंत प्रदीपच्या नातेवाईकांनी माढा पोलीस ठाण्यात ठिय्या मारला होता. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी पोलीस ठाण्यात जाऊन या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली. प्रदीपचा विवाह अवघ्या सहा महिन्यापूर्वीच झाला होता. त्याच्या पश्चात पत्नीसह आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment