Monday 18 March 2019

नगरमध्ये पवार विरूद्ध विखेच लढत

नगरमध्ये पवार विरूद्ध विखेच लढत

नगर – नगर जिल्ह्यातील नेत्यापेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे उमेदवार निश्‍चितीबाबत अजूनही घोळ सुरू असून आज राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीतही नगरचा उमेदवार जाहीर होवू शकला नाही. दरम्यान, उमेदवार कोणी असला तरी या मतदारसंघाची सर्वच जबाबदारी आता राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांच्यावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे पवार कुटुंबियाचा सदस्यच ही निवडणूक प्रक्रिया हताळणार असल्याने या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात पवार विरूद्ध विखे अशीच लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पवार व विखे यांच्यातील संघर्ष आता आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिंरजीव डॉ. सुजय विखे यांनी गेल्या तीन वर्षांपासून लोकसभेची तयारी सुरू केली होती. कॉंग्रेस आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे असली तरी कॉंग्रेसला ही जागा सोडली जाईल या आशेवर डॉ. विखेंनी सर्व मतदारसंघ पिंजून काढला होता. परंतू पूर्वपार सुरू असलेला पवार-विखे वाद नातवाला नडला. कै.पद्मभूषण बाळासाहेब विखे व शरद पवार यांच्यातील संषर्घ तिसऱ्या पिढीपर्यंत सुरू असल्याचे या निमित्ताने दिसून आले. राष्ट्रवादी ही जागा कॉंग्रेसला सोडण्यास व डॉ. विखेंना राष्ट्रवादीमध्ये घेण्यास तयार नसल्याने डॉ. विखे यांनी अखेर कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवाराचा नाद सोडून अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढण्याचा मानस असलेल्या डॉ. विखेंनी हातात कमळ घेवून पवार यांना देखील आपली राजकीय ताकद दाखवून दिली. विखेंना कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेस आघाडीची उमेदवारी न देण्याची भूमिका खुद्द शरद पवार यांनी घेतली होती.
विखे भाजपवासी झाल्यानंतर त्यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न आता राष्ट्रवादी करीत आहे. त्यातून 1991 ची पुनरावृत्ती करणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले. परंतू ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे चिंरजीव व प्रशांत गडाख यांनी उमेदवारी करण्यास नकार दिला. 1991 मध्ये यशवंतराव गडाख यांनी बाळासाहेब विखे यांचा पराभव केला होता. त्याची पुनरावृत्ती करण्याचे भाकीत पवार यांनी केले होते. त्याला डॉ. विखे यांनी नुकतेच 1991 नाही तर 1999 ची पुनरावृत्ती करणार असल्याचे आव्हान दिले. त्यामुळे पवार व विखे यांची संघर्ष आता पेटला असल्याचे दिसत आहे.
भाजपकडून विखेंची उमेदवारी अद्यापही जाहीर झाली नसली तरी ते उमेदवार असली असे गृहीत धरून पवार यांनी या मतदारसंघात नियोजन करण्यास सुरूवात केली आहे. पक्षाचे युवा नेते रोहित पवार यांच्यावर या मतदारसंघाची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
रोहित यांच्यावर बारामती, माढा यासह नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे. याचा अर्थात शरद पवार यांनी ही जागा किती प्रतिष्ठेची केली याचा अंदाज येतो. उमेदवार अद्याप निश्‍चित झालेला नाही तरी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला पाहिजे, असे नियोजन केले जात आहे. त्यासाठी रोहित यांच्याकडे हा मतदारसंघ देण्यात आला आहे. अर्थात समन्वयक या गोडस नावाखाली या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली असली तरी शरद पवार यांच्या सुचनेनुसार रोहित या मतदारसंघाचे नियोजन करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या मतदारसंघात पवार विरूद्ध विखे अशी लढत होणार असल्याचे चित्र आहे.
रोहित पवार काल नगर दौऱ्यावर आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून दुष्काळाबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्यानंतर आमदार अरूण जगताप यांच्या संपर्क कार्यालयाला भेट देवून त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात बुथ मेळाव्याचे नियोजन केले. येत्या 18 मार्चपासून ते या मतदारसंघातील सात तालुक्‍यांमध्ये बुथ मेळाव्याच्या माध्यमातून फिरणार आहेत.

1 comment:

Bhagwan baba png 5