Tuesday, 5 March 2019

पुर्वी असायचे लग्न उत्सव, आता लगिन घाई



(भाग दुसरा)

माझ्या आई वडिलांच्या लग्नात आमचे चारदरी हे वंजारी व मराठा गाव एका विचाराचे व हट्टी असल्याने थकलेली वृद्ध माणसे सोडता सर्व लग्नाला निघाल्याने दूध काढणे भाग असणारी जनावरे सुध्दा सोबत घेतली होती .
वऱ्हाडात आपली गाडी व बैल आकर्षक दिसावी म्हणून दोन दिवस अगोदर सजावट , बैल धुणे , शेपटीचे केस कापून गोंड्यांचा आकार , शिंगे तासून गोंडे रिबीन बांधली जायची . गाडीला बैल जुंपताना आकर्षक ठेवणीतल्या झूली बैलांच्या पाठीवर चढवल्या जात. एखाद्याकडे तांगा असेल तर लोक प्रतिष्ठीत समजत , गाव सोडले की गाड्यांची पळववण्यात चढाओढ लागे. बसलेल्यांना आदळे बसु नये तसेच बैलांच्या चाऱ्याची व्यवस्था म्हणून अर्धा साठा कडबा वैरण गाडीत साठवलेली असे .

गाड्या पळवण्यांची चढाओढ असली तरी दोन गावांची सीमारेषा येईल तेथे कार्य कुटुंबातील पुरुष १ नारळ फेकूनच पूढे निघत . सरासरी ४ कि.मी. अंतरावर दूसरे गाव आले की सर्व बैलगाड्या रांगेत उभा करत . समोरची गाडी वधू-वर कुटुंबातील सजलेली असे , एक गाडी सनई - सुर ( जवळपास ४ फूट लांब असे ) ढोलकी , झांज अश्या वाजंत्री चा ताफा असणारी मंडळी गाडीतून खाली उतरून सर्वात पूढे वाद्य वाजवत चालत . तो अवर्णनीय सुगम आवाज ‌कानी पडताच कुठले तरी वऱ्हाड आले एकमेकांना ओरडून सांगत पहायला पूर्ण गाव बाहेर जमून कुतूहलाने चर्चा करी. उन्हाळ्याचे दिवस असल्याने तहान लागलेल्यांना त्या गावची मंडळी पाणी पुरवत . वऱ्हाड जर १५ / २० कि.मी.म्हणजे ग्रामीण भाषेतील ५ / ७ कोस प्रवास करणार असेल तर दूपार पूर्वी निघून मध्य अंतरावर सावली पाणी पाहून दुपारी विश्रांती घेत. सोबत आणलेली बादली , तिला कासरा म्हणजे बोटाच्या जाडीचे दावे ( दोर ) व सोबत आणलेल्या घागरी घेऊन पुरुष मंडळी विहीरीतील पाणी शेंदून घागरी भरुन महिलांजवळ आणून ठेवत. प्रत्येकाला तांब्या मिळण्याची वाट बघण्यापेक्षा काही वयस्कर पूरुष पळसाच्या पानांचे डोफे ( द्रोण ) बनवून देत त्यातील पाणी पिण्याची चव काही न्यारी ( खास ) असे . महिला दगडाच्या चुली बनवून सोबत आणलेली भांडी , पीठ , तिखट , मीठ तेल काढून अवीट चवीचे बेसण भाकरी बनवत त्यावर वऱ्हाड तुटून पडे . आजच्या प्रमाणे तयार पात्र नव्हते , पळसाच्या पानांवर किंवा हातावर भाकरी त्यावर बेसण अशी आजच्या बफे प्रमाणे सोय करुन घ्यावी लागे ! जेवणे आटोपली की विस्तव काळजीपूर्वक मातीने बुजवला जायचा आणि वऱ्हाड बैलांना वैरण टाकून शक्यतो आंब्यांच्या झाडाखाली शांत झोपलेले असे . आडराणात असूनही दागिण्यांनी नटलेल्या महिला बिनधास्त गाढ झोपेत असत . इथे दागिण्यांचे वर्णन करणे विशेष ठरेल. आजच्या प्रमाणे ४ / २ तोळे नव्हे तर १० ग्राम चे १ अख्खे सोन्याचे नाणे ज्याला पुतळी म्हणत त्यांची माळ प्रतेक महिलेच्या गळ्यात असे . बोरमाळ , कमरेला चांदीचा कंबर बंद ( पट्टा ) ,  दोन्ही पायांचे मिळून ५०० ग्राम चांदीचे तोडे , नाकात जाड नथ किंवा राजस्थानी मोठी गोल काडी , कानाला जाड झुंबर,  दंडाला जाडजूड बाजूबंद असे श्रीमंती अलंकार असत. पुरुषांच्या दोन्ही कानाला जाड सोन्याच्या बाळ्या रुबाबदार दिसत , आजच्या एक कानाला दिसणारा सोनेरी बोरीचा काटा जो गुंड किंवा पुरुषत्व नसल्याचे भासवतो बघून ‌त्या काळात लोकांनी पालथा घालून खेटर / जोड्याने ( त्या काळचे कातडे , जाड खिळे ठोकून प्रत्येकी १ किलो वजनाचे पायतान ) ठोकले असते !

गाड्या तुफान पळवताना चाकाची कुणी / खुंटी निघणे , मोडणे , दांड्या मोडल्याने गाडी पालथी होऊन खरडत पूढे गेल्याने अपघात झाल्याच्या घटना कधी कधी घडत .
दुपारचे २ वाजले म्हणजे ऊन टळले , सुर्य माथ्यावरून मावळतीकडे कलला पाहून गाड्यांना बैल जुंपून पूढील प्रवास  सुरू व्हायचा .जर अंतर १० कोस  ( ३० कि.मी.) किंवा जास्त असेल वऱ्हाड गावातून दुपारनंतर निघे व सोयीचे गाव पाहून रात्री मुक्काम करावा लागे. तिसऱ्या प्रहरी म्हणजे ४ वाजता नियोजित गावी वऱ्हाड गावापासून दिसण्या एवढ्या अंतरावर झाडांची दाट सावली पाहून गाड्या थांबवून बैलांना वैरण टाकली जायची.पाराजवळ वऱ्हाड येण्याची वाट पाहणारे लोक गाड्यांचा धुरळा पाहून लहान मुले ओरडून पळत गावात जायचे . गावातून काही लोक पाणी भरलेल्या घागरी भरुन व सोबत शिरा भात भरलेले टोपले घेऊन वऱ्हाडी कडे सेवेला सादर असत.

वऱ्हाड आलेले कळल्यावर नवरा - नवरीला आंघोळी घालून भेट या मानाच्या कार्यक्रमासाठी गाव लेझीम , वाजंत्री व बैलगाडीत नवरा मुलगा , करवल्या करवले बसवून  धुमधडाक्यात पाराजवळून वऱ्हाडा पर्यंत पोहचायला तासभर वेळ लागे . गाडीत करवल्यांच्या हातात दोन काठ्यांना दोन गुढ्या प्रमाणे साड्या बांधलेल्या व पताका प्रमाणे वर द्रोणाचा आकार व खाली ४ पदरी गुलाबी कागदाची फुले असलेल्या "धजा / ध्वजा' काठ्यांवर अडकवून साड्यांबरोबर गाडीत दोन्ही बाजूंनी उंच धरलेल्या असत. एक करवली शेलकट ( घुंघट ) पांघरुन हातात ताट व ताटात शिजवलेला भात जो गाडीच्या पाठीमागे पायी चालताना अधुन मधून थोडा थोडा शिंपत चालत असे .

न्हावी समाजाचा माणूस डोक्यावर पाणी भरलेली घागर तर परीट घोंगडी सोबत घेऊन चाले . नवरा व नवरी दोन्ही कडच्या वाजंत्र्यांचा जल्लोष दोन्ही जवळ आले की वाद्य फुटतील एवढा धांगडधिंगा चालायचा जसे यांच्यात वाद लागल्याचा भास व्हायचा. रिती प्रमाणे भेट झाल्यावर वऱ्हाडींना जानवसा घरी म्हणजे थांबण्याच्या ठिकाणी आणून सोडत . मानपान आहेर झाल्यावर जेवण्याची व्यवस्था रस्त्यावर , उकांडे किंवा गावाबाहेरच्या शेतात केली तरी तक्रार नसे . तक्रार व्हायची फक्त बैलांना वैरण पेंड कमी पडली म्हणून नवरा रुसायचा ! लग्न रात्री ८ च्या पुढे पण जेवणे आटोपल्यावरच परण्याचा जल्लोष उरकल्यानंतर लागायची . नंतरचे विधी पार पडल्यानंतर रात्रीत रुखवत तोही गावभर मिरवून वऱ्हाड घरी आणल्यावर वऱ्हाडी खाण्यासाठी तुटून पडत. रात्रीत वराच्या आईला स्नान घालून सुन मुख पहाणी , पायधूनी कार्यक्रम व्हायचे . सकाळी पुन्हा न्याहारी पदार्थ जंगी मिरवणूकीने वऱ्हाड घरी पोहचते व्हायचे . नंतर साडेभरणी व दुपार नंतर नवरीला निरोप वाटे लावण्याच्या प्रसंगी गावातील एक ना एक माणूस गावची लेक पाहूणी झाली ‌म्हणून ओक्साबोक्शी रडत .मुलगी नजरेआड झाल्यावर अख्खे गाव रात्रभर आठवण काढत हळहळ करी . इकडे वऱ्हाड गावी पोहचले की नवरा नवरी पारावर बसवून लोक आपापल्या घरी तर बैलगाड्या शेताकडे जात . संध्याकाळी जेवणे आटोपली की सजवलेली बैलगाडी , वाजंत्री , लेझीम चा धडाका रात्रभर चाले तेव्हा पूर्ण गाव जागे असे .रात्रीत विविध सोंगे आणून व बाणी नावाचा गाण्यातून गुणवर्णन , टिंगल करताना निर्देश केला की - साथीदार भले भाई भले म्हणत संगत करी ! प्रत्येक घरासमोरुन वरात जाताना चहा , फळे किंवा साखर नवरा नवरीच्या हातावर घरचे घालीत . पहाटे वरात घरी आल्यावर उंबरठ्यावर माप उलटवणे , पराती पायाने ढकलून एकत्र करणे , एका ताटात दोघांना खायला लावणे , दोघांनी वयस्करांच्या मांडीवर बसून कोणाचे वजन जास्त विचारणारे उपक्रम पार पडत . दुसऱ्या दिवशी ग्रामदैवत , कुलदेवतांच्या दर्शनासाठी असे . तिसऱ्या दिवशी गुळणा गुळणी , हळद काढणी ,‌ काही दिवसांनी सत्यनारायण पुजा असा आनंदी आनंद असायचा !

कुठे हळदीनंतर तर कुठे परण्या पूर्वी वाघीसणा म्हणजे मुलीला कपडे देण्याचा कार्यक्रम खरा उच्चार "वांगनिश्चय" असा होतो . नवरदेवाला शेवंती (नवे कपडे) पारावर जेष्ठ जावयाचा मान दिल्यावर चढवत . लग्न लावायला निघताना आपापल्या घरच्या महिला सोबत सुरक्षा म्हणून धने व जिरे न्यायला भाग पाडत . बिड , धाराशिव (उस्मानाबाद) व लातूर जिल्ह्यातील मान्यतेनुसार लग्न दोष पायबंद घालण्याचे काम केज तालुक्यातील कोरडेवाडीचे राख यांच्याकडून मंतरलेली वाळू नेतात ! तिचा उपयोग लग्न घरी टांगून ठेवणे , मांडवात शिंपडणे , नवरा नवरी च्या दंडाला कापडी गाठी बांधुन केला जातो .

वैशाख ज्येष्ठ महिन्यात विवाहित झालेल्या जोडप्यांना एकत्र येण्यासाठी सत्यनारायण पूजेला १६ दिवसांची प्रतिक्षा करावी लागे . कसेतरी जवळ येऊन मने जुळायला वेळ मिळतो न मिळतो आषाढ महिना नवदाम्पत्याला रावणाच्या लंके प्रमाणे भासे. आषाढ महिन्यात नव वधू वरांनी एकमेकांची तोंडे पहायची नाही प्रथा कटाक्षाने पाळली जात असल्याने वधू वरास राम सिते प्रमाणे विरहाच्या वेदना व पालक रावन भासायचे ! लग्न होऊन मुलबाळ झाले तरी नवरा बायकोस एकमेकांना घरातल्या समोर बोलने संकोचाचे व धाकाचे असायचे !  तर असे होते मित्रांनो मागच्या पिढीतील लग्न.
आणखी वर्णन करण्यासारखे ‌लहान सहान विषय टाळत आहे. पण एक गोष्ट तर निश्चित नमूद कराविशी वाटते की,  पुर्वीचे लग्न खरोखरच उत्सव होते आता फक्त लगिन घाई शिल्लक उरली आहे.

No comments:

Post a Comment

Bhagwan baba png 5